Arjun Tendulkar Engagement | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 13 ऑगस्ट 2025 रोजी साखरपुडा पार पडला. मुंबईतील एका खाजगी सोहळ्यात झालेल्या या समारंभात अर्जुनने त्याची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोकसोबत (Saniya Chandok) विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कुटुंबांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, हा साखरपुडा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Arjun Tendulkar Engagement)
अर्जुन 25 वर्षांचा असून, त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुण वयातच लग्नाचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या 22 व्या वर्षी अंजली मेहताशी लग्न केले होते. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, अर्जुनची होणारी पत्नी आणि सचिनची सून सानिया चंडोक नक्की कोण आहे आणि ती काय करते?
उद्योगपती कुटुंबातील नात :
सानिया चंडोक (Saniya Chandok) ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉटेल आणि खाद्य उद्योगात प्रसिद्ध असून, त्यांचे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी हे लोकप्रिय व्यवसाय आहेत.
सानियाचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल येथे झाले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. 2020 मध्ये ती भारतात परतली.
Arjun Tendulkar Engagement | प्राणीप्रेमातून व्यवसाय :
प्राणीप्रेमी असलेल्या सानियाकडे तीन पाळीव कुत्रे आहेत. भारतात परतल्यानंतर तिने प्राण्यांवरील प्रेमातून स्वतःचा व्यवसाय सुरु केला — मिस्टर पॉज प्रीमियम पेट सलून. वरळीतील उच्चभ्रू भागात असलेल्या या सलूनला सेलिब्रिटी आणि श्रीमंत ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सानियाने पशुवैद्यकीय तंत्रज्ञाची पदवीही घेतली आहे. तिच्या मिस्टर पॉज या सलूनचे सोशल मीडियावर पेज असून, त्याला सुमारे ३,७५० फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही हे पेज फॉलो करतात. (Arjun Tendulkar Engagement)
लंडनपासून सुरु झालेलं नातं :
सानिया ही सारा तेंडुलकरची खास मैत्रीण आहे. दोघींनीही लंडनमधून पदवी घेतली असून, त्याच काळात अर्जुन तेंडुलकरही लंडनमध्ये क्रिकेट प्रशिक्षण घेत होता. याच काळात अर्जुन आणि सानियाची ओळख अधिक घट्ट झाली.
अर्जुन आणि सानियाचा हा साखरपुडा त्यांच्या दीर्घ मैत्रीचं नातं पुढच्या टप्प्यावर नेणारा आहे. क्रिकेट विश्वात आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अर्जुनच्या आयुष्यात हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे, तर सानियासाठीही तेंडुलकर कुटुंबाचा भाग होणं हा विशेष क्षण आहे.






