Deepak Kate | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेकीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक सिताराम काटे हा कोण आहे, त्याचा नेमका राजकीय आणि सामाजिक प्रवास काय आहे, यावर सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. शिवाय, संभाजी ब्रिगेड या नावालाच विरोध करणाऱ्या या व्यक्तीमागचे खरे कारण काय? याचाही तपशील आता समोर येत आहे.
कोण आहे दीपक काटे? (Who is Deepak Kate) :
दीपक काटे हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावचा रहिवासी असून, तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीत राहतो. तो ‘शिवधर्म फाउंडेशन’ या संघटनेचा संस्थापक असून, हिंदुत्ववादी विचारसरणीवर आधारित विविध आंदोलने, मोर्चे आणि निषेध करत राहिलेला आहे.
यापूर्वी त्याने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ‘संभाजी बिडी’ या नावाला विरोध दर्शवून आंदोलन केलं होतं. त्यानंतर संबंधित बिडी ब्रँडचं नाव बदलण्यात आलं. त्याने दूध दराच्या आंदोलनातही मंत्रालयाबाहेर मोर्चा काढला होता.
Deepak Kate | गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास :
– दीपक काटेचं नाव फक्त सामाजिक आंदोलनांपुरतं मर्यादित नाही, तर त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत.
– 2005 साली सराटी गावातच झालेल्या शेताच्या वादातून त्याने चुलत भावाचा खून केला होता. त्या प्रकरणात तो सात वर्ष येरवडा कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आला आहे.
– 6 जानेवारी 2025 रोजी पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना त्याच्या बॅगेतून पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे सापडली होती. त्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती.
– 2021 मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे एका उद्योजकाला काळं फासल्याप्रकरणीही त्याचे नाव चर्चेत आलं होतं.
संभाजी ब्रिगेड नावाला विरोध का? :
दीपक काटे (Deepak Kate) आणि त्याच्या शिवधर्म फाउंडेशनने गेल्या काही महिन्यांपासून ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून या संघटनेचं नाव ‘संभाजी ब्रिगेड’ ठेवणं हे अपमानास्पद आहे.
त्यांनी अनेकदा मागणी केली की, या संघटनेच्या नावात ‘छत्रपती’ किंवा ‘धर्मवीर’ अशा सन्मानार्थक शब्दांचा वापर करावा. या मागणीचा फोल प्रतिबिंब म्हणजे अलीकडे अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाडांवर झालेली शाईफेक, असं अनेकांचं मत आहे.
राजकीय संबंध आणि भाजप प्रवेश :
दीपक काटेने (Deepak Kate) 2022 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच 2023 मध्ये इंदापूरमध्ये भाजपच्या 52 शाखांचं उद्घाटन त्याने चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केलं होतं.
त्यामुळे त्याचे भाजपमधील संबंध स्पष्ट दिसतात, जरी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी “त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही,” असं स्पष्ट केलं असलं तरी.






