Jagdeep Dhankhar | देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. 21 जुलैपासून धनखड कुठे आहेत हा प्रश्न आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. यामुळे मोदी सरकारवर दबाव वाढला असून, सरकार मात्र या विषयावर सावध भूमिका घेत असल्याचं दिसतं.
धनखड यांच्या राजीनाम्याची वेळ आणि पद्धत यामुळे चर्चांना उधाण आले. पावसाळी अधिवेशन सुरु असताना त्यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या गूढ ट्विटमुळे “ऑल इज नॉट वेल” अशा चर्चा सुरु झाल्या. विरोधकांचा आरोप आहे की, हे फक्त तब्येतीचे कारण नसून सरकार आणि धनखड यांच्यात मतभेद झाले होते.
विरोधकांचा सरकारवर जोरदार प्रहार :
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ‘लापता उपराष्ट्रपती’ असा उल्लेख करत धनखड यांची खिल्ली उडवली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा उचलत, “माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत? त्यांचे काय झाले?” असे प्रश्न विचारले. राऊत यांनी चीन आणि रशियासारख्या देशांत विरोधकांना गायब करण्याची परंपरा असल्याचा आरोपही सरकारवर केला. (Jagdeep Dhankhar)
दरम्यान, राजस्थानमध्ये भाजपने प्रवक्ता कृष्णकुमार जानू यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड यांच्या समर्थनातील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई झाली. जानू यांनी जाट समाजातील ज्येष्ठ नेत्यांशी पक्ष वाईट वागणूक देत असल्याचा आरोप केला होता.
Jagdeep Dhankhar | शांतता की राजकीय ‘टायमिंग’? :
धनखड यांनी उपराष्ट्रपतीसारख्या अतिमहत्त्वाच्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने अनेकांना हे पाऊल फक्त भावनिक किंवा आरोग्याच्या कारणाने घेतलेलं नसल्याचं वाटतं. विरोधकांचा आरोप आहे की, सरकारसोबत वाढलेले मतभेद हेच मूळ कारण असावं. (Jagdeep Dhankhar)
सध्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने भाजप सावध भूमिकेत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, धनखड शांत बसण्याचा निर्णय तात्पुरता असू शकतो आणि ते योग्य वेळेची वाट पाहत असतील. जर त्यांचा रोष उघडपणे समोर आला, तर मोदी सरकारच्या अडचणींमध्ये भर पडू शकते.






