Rohit Arya | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) येथील आरए स्टुडिओमध्ये (RA Studio) १७ मुलांना ओलीस ठेवण्याच्या थरारनाट्याचा अखेर अंत झाला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्टुडिओच्या बाथरूममधून प्रवेश करत या सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
ऑडिशनच्या नावाखाली थरार-
गेल्या सहा दिवसांपासून पवई (Powai) येथील आरए स्टुडिओमध्ये (RA Studio) एका वेबसीरीजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलावण्यात येत होते. ही प्रक्रिया सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालत असे, ज्यात दुपारी जेवणाची सुट्टीही दिली जात होती. मात्र, आज मुले जेवणासाठी बाहेर न आल्याने संशय बळावला.
चौकशीत, रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने या १७ मुलांना स्टुडिओत डांबून ठेवल्याचे उघड झाले. त्याने पोलिसांना एक व्हिडिओ पाठवून धमकी दिली होती की, ‘मला काही प्रश्न विचारायचे आहेत, जर कोणी आत येण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण जागेला आग लावून मुलांना जाळून टाकेन’. त्याच्याकडे एक एअर गन आणि काही रसायनेही होती.
पोलिसांची कारवाई आणि चकमक-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ स्टुडिओला वेढा घातला. रोहितसोबत (Rohit Arya) वाटाघाटी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, पोलिसांनी धाडसी निर्णय घेतला. पथकाने स्टुडिओच्या बाथरूमच्या काचा तोडून आत प्रवेश केला.
यावेळी पोलीस आणि रोहित आर्य (Rohit Arya) यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत रोहितच्या छातीला गोळी लागली, यात तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका केली. जखमी रोहितला (Rohit Arya) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या कारवाईला एन्काऊंटर (Encounter) म्हटले आहे.






