Weather Update| महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार सलामी दिली आहे. कालपासून सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बळीराजाही शेतीच्या कामांसाठी सज्ज झाला आहे. हवामान विभागाने (IMD) आज, ९ जून रोजी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कोकणात पाऊस सक्रिय
रत्नागिरी (Ratnagiri) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे. कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी, तर कुठे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. कालपासूनच ‘मृग नक्षत्राची’ सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे भातशेतीच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. कोकणात दमदार हजेरी लावल्यानंतर मान्सून आता मुंबईच्या (Mumbai) दिशेने वेगाने सरकला आहे.
मुंबई, पुणे आणि नाशिकसह ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज ९ जून रोजी महाराष्ट्रातील २५ ते ३० जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे:
मुंबई, ठाणे आणि पालघर: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाणे आणि पालघरमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.
दक्षिण कोकण: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मान्सून पूर्णपणे सक्रिय असून येथे पावसाचा जोर कायम राहील.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे (Pune), सातारा आणि कोल्हापूर परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाला असून, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक (Nashik) आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भाच्या (Vidarbha) काही भागांत पाऊस काहीसा सौम्य राहील. या भागांतील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
News Title: Weather Update Monsoon Arrival Yellow Alert Update Maharashtra






