Weather Update | राज्यात तसेच देशभरात हवामानाचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. काही भागांत अजूनही थंडीची चाहूल आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, दुपारच्या वेळी वाढत्या उकाड्यामुळे उन्हाळा जवळ आल्याची जाणीव होत असून हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
तापमानात वाढीचा अंदाज :
देशातील विविध राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच वातावरणात मोठे चढउतार दिसून येत आहेत. उत्तरेकडील प्रदेशात अजूनही गारवा कायम असला तरी इतर भागांमध्ये सकाळी थंडी आणि दुपारी उष्णता अशी विसंगत परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. किमान तापमानात सातत्याने बदल होत असून दुपारी वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. हवामानातील या बदलांचा परिणाम थेट आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला आणि इतर तक्रारी वाढताना दिसत आहेत.
भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किमान तसेच कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केरळमधील कोची (Kochi) येथे देशातील सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात अमरावती (Amravati) येथे 36 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
Weather Update | उत्तर भारतात बदलते चित्र :
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab) आणि हरियाणा (Haryana) या राज्यांमध्ये पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत थंडी कमी होत असली तरी तापमानात चढउतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असून सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढू शकते.
18 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील सुमारे 19 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील आठवड्यात कमाल तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नसून ते 3 ते 4 अंशांनी वाढू शकते आणि त्यानंतर किंचित घट होऊ शकते. तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळ (Kerala) मधील काही भागांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई (Mumbai) येथे तापमानात सतत बदल होत असून कमाल तापमान पस्तिशीच्या खाली आहे. दादर चौपाटी परिसरात सकाळपासून आभाळ दाटलेले दिसून येते, तर दुपारी 12 ते 4 दरम्यान उन्हाचा तडाखा कायम असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान तापमान 21 अंश तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमवारी 35 अंशांवर गेलेले तापमान आता घटून 32 अंशांवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र गुरुवारपासून पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे.






