Wankhede Stadium Stands | मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये तीन स्टँडना नवे नाव देण्यात आले असून, हे नाव क्रिकेट आणि प्रशासन क्षेत्रातील दिग्गजांचे देण्यात आले आहेत. या तीन स्टँडला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांची नावे देण्यात आली आहेत. या भव्य नामकरण समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू आणि अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने भारतीय क्रिकेटमधील तीन वेगवेगळ्या युगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, खेळत असतानाच स्टँडला नाव देण्यात येणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
रोहित शर्माचा सन्मान – खेळपट्टीवरचा यशस्वी प्रवास :
एमसीएने रोहित शर्माच्या दीर्घकालीन आणि प्रभावशाली क्रिकेट प्रवासाची दखल घेत त्याच्या नावाने स्टँड सन्मानित केला. वानखेडे मैदानावर रोहितने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. अलीकडेच रोहितने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, आता तो फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले, “रोहित शर्मा खेळत असताना त्याच्या नावाने स्टँड होणे ही अभिमानाची बाब आहे. हे ऐतिहासिक असून, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो आणखी चांगला खेळेल.” तसेच, राज्यात आणखी क्रिकेट मैदान उभारण्याचा प्रयत्न होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Wankhede Stadium Stands | अजित वाडेकर आणि शरद पवार – ऐतिहासिक योगदानाची दखल :
अजित वाडेकर यांनी भारताच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचे नेतृत्व 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये केले होते. त्यांनी 37 कसोटी सामने खेळले होते. त्यांच्या स्मरणार्थ स्टँडचे नामकरण करण्यात आले.
शरद पवार यांनी 2005 ते 2008 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. 2011 च्या वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन आणि भारतीय क्रिकेटसाठी प्रशासनिक पातळीवर केलेले योगदान लक्षात घेता त्यांच्याही नावाने स्टँड सन्मानित करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “मी क्रीडामंत्री असताना वानखेडे स्टेडियमची उभारणी झाली. आज त्या इतिहासाचा साक्षीदार होतो आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांचं योगदानही अविस्मरणीय आहे.”






