मुंबईत मतदानावर बहिष्कार! महापालिका निवडणूक धोक्यात?

On: January 12, 2026 6:28 PM
Voting Boycott in Mumbai
---Advertisement---

Voting Boycott in Mumbai | महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असतानाच आता मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तब्बल 15 ते 20 हजार मतदारांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय समोर आल्यामुळे संबंधित प्रभागातील मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुहू परिसरातील नागरिकांच्या या भूमिकेमुळे महापालिका निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जुहू परिसरात बहिष्काराचे बॅनर :

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. या परिसरातील सुमारे 200 इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रभागातील निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे.

या भागात लष्करी रडार असल्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून सुमारे 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्ट्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे 15 ते 20 हजार नागरिक वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

Voting Boycott in Mumbai | आश्वासनांवर नाराजी, तोडगा कधी? :

स्थानिक नागरिकांनी अनेकदा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला, मात्र त्यांना यश आलेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. (Voting Boycott in Mumbai)

दरम्यान, प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी या नागरिकांची भेट घेतली असून, निवडणुकीनंतर नागरिकांची आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून देत प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता नागरिक मतदानावरील बहिष्कार मागे घेतात की आपली भूमिका कायम ठेवतात, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

News Title: Voting Boycott in Mumbai: 15,000–20,000 Voters Threaten to Skip Municipal Election

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now