Vaibhav Sooryavanshi | भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील टी-20 मालिकेपूर्वी संघनिवडीची चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) प्रथमच टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याच्या संभाव्य पदार्पणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल (IPL) आणि इंडिया ए (India A) संघाकडून केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे वैभवला संधी मिळावी, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देताना संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सलामीच्या जागांसाठी तगडी स्पर्धा :
सध्या भारतीय टी-20 संघातील सलामीवीरांच्या जागा जवळपास निश्चित मानल्या जात आहेत. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या तिघांनी अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. विशेषतः टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील योगदानामुळे त्यांची जागा अधिक मजबूत झाली आहे.
न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या अंतिम सामन्यात या तिघांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे केवळ वैभवला संधी देण्यासाठी या तिघांपैकी एखाद्याला बाहेर ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी सोपे ठरणार नाही. दुसरीकडे, श्रीलंका अ (Sri Lanka A) विरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली आहे.
Vaibhav Sooryavanshi | संघ संतुलनाचा मोठा प्रश्न :
संजू सॅमसनची सलामीवीर म्हणून आकडेवारी उत्कृष्ट आहे. ओपनिंग करताना त्याचा स्ट्राइक रेट 181 पेक्षा अधिक राहिला आहे. मात्र मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याच्या खेळातील आक्रमकता कमी झाल्याचे आकडे सांगतात. त्यामुळे वैभवला संधी देण्यासाठी सॅमसनला खाली पाठवणे संघासाठी जोखमीचे ठरू शकते.
त्याचवेळी अभिषेक शर्मा सध्या टी-20 क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक मानला जातो. 190 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. विद्यमान संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर व तिलक वर्मा (Tilak Varma) यांच्या जागा निश्चित मानल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावरच काही बदल करण्याची शक्यता दिसते. मात्र ती जागा प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडूंसाठी राखीव असते. शिवम दुबे (Shivam Dube), अक्षर पटेल (Axar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) हे त्या स्थानासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे वैभवला संघात स्थान द्यायचे असल्यास गंभीर (Gautam Gambhir) आणि श्रेयस अय्यर यांना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.






