हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक घुसले अमेरिकन कमांडो; कर्मचारी चक्रावले, पाहा काय घडलं?

On: August 6, 2026 12:36 PM
Hinjewadi IT Park
---Advertisement---

Hinjewadi IT Park | पुणे येथील हिंजवडी (Hinjewadi) आयटी पार्कमध्ये बुधवारी अचानक मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांचे आगमन झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. एनएसजी (NSG) कमांडो, फोर्स वन (Force One) आणि अमेरिकेच्या लष्करातील कमांडो एकत्र दिसल्याने अनेकांना नेमके काय घडत आहे, याची कल्पना नव्हती. मात्र, ही संपूर्ण कारवाई दहशतवादविरोधी मॉक ड्रिलचा भाग असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

सहा तास चालली दहशतवादविरोधी मॉक ड्रिल :

हिंजवडी फेज-2 मधील इन्फोसिस (Infosys) कॅम्पसमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (National Security Guard) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. या सरावात अमेरिकेच्या लष्करातील 17 कमांडोंसह 26 स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी, एनएसजी कमांडो, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक सहभागी झाले होते.

या सरावादरम्यान आयटी पार्कमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचा काल्पनिक प्रसंग उभा करण्यात आला. विविध सुरक्षा यंत्रणांनी अशा परिस्थितीत कसा प्रतिसाद द्यायचा, बचाव आणि कारवाईची प्रक्रिया कशी राबवायची याचा प्रत्यक्ष सराव केला. अमेरिकन कमांडोंच्या उपस्थितीमुळे आणि संपूर्ण परिसरात वाढविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अनेक कर्मचारी काही काळ गोंधळात पडले होते.

Hinjewadi IT Park | अत्यंत गोपनीयतेत पार पडला सराव :

ही मॉक ड्रिल 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत पार पडली. जवळपास सहा तास सुरू असलेल्या या सरावादरम्यान संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील बहुतांश कर्मचाऱ्यांना किंवा इतर संबंधितांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. अचानक मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल दाखल झाल्याने अनेकांना प्रत्यक्षात दहशतवादी घटना घडल्याचा संशय आला.

मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे आणि तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे हा होता. अशा प्रकारच्या संयुक्त सरावातून सुरक्षा दलांच्या कार्यपद्धतीची चाचणी घेतली जाते तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते.

News Title: US Commandos Join Hinjewadi Drill

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now