Pune Rain News | पुण्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली असून या पावसाचा पहिला बळी गेला आहे. गुरुवारी दुपारी अवघ्या तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. या दरम्यान सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Unseasonal Rain Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक अवकाळी पावसाने पुणे शहराला झोडपून काढले. सिंहगड रोड परिसरातही जोरदार पाऊस झाला. नवश्या मारुती मंदिराजवळ पावसामुळे एक मोठे झाड कोसळले आणि त्या झाडाखाली तीन जण अडकले. या दुर्घटनेत रंजना नवनाथ गिरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.
झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले :
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र रंजना गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Tree Fall Accident)
Pune Rain News | शहरात ठिकठिकाणी पाणी साचले :
दरम्यान, अवकाळी पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंढवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
काही ठिकाणी पाण्यात वाहनं बंद पडल्याच्या घटनाही समोर आल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. (Pune Rain News)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरीही कोसळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






