Unnao Rape Case | उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणाने पुन्हा एकदा देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषी भाजपचे माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही शिक्षा स्थगित करत त्यांना जामीन मंजूर केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयानंतर पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी आंदोलन केलं असता, त्यांच्यावरच पोलिसांकडून कारवाई झाल्याने प्रकरण आणखी चिघळलं आहे.
पीडित मुलीच्या आईसह कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची आणि मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोषी ठरलेल्या व्यक्तीला दिलासा मिळतो, पण पीडित कुटुंबीयांवर कारवाई होते, ही बाब अनेकांना अस्वस्थ करणारी ठरत आहे.
आदित्य ठाकरेंचा तीव्र संताप :
या संपूर्ण घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. उन्नाव बलात्कारातील दोषीला जामीन देणं आणि त्याचवेळी पीडितेला व तिच्या आईला पोलिसांकडून मारहाण होणं हे अत्यंत धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे जगभरात चुकीचा संदेश जात असल्याचं सांगत त्यांनी याला अन्यायकारक आणि अमानवीय ठरवलं आहे. (Aaditya Thackeray reaction)
निवडणुकीच्या काळात महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात, योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात पीडित महिलांशी कसा व्यवहार केला जातो, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी होती, पण त्याऐवजी त्याला जामीन मिळतो, हे न्यायाचं अपयश असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
Unnao Rape Case | सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार :
दरम्यान, या प्रकरणात आता सीबीआयनेही महत्त्वाची भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दोषी आमदाराला दिलेला जामीन रद्द करण्यासाठी लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरण हे केवळ एका पीडितेपुरतं मर्यादित नसून, संपूर्ण न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं प्रकरण ठरत आहे. जोपर्यंत पीडितेला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत या अन्यायाविरोधात आवाज उठवणं गरजेचं असल्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. दोषींना शिक्षा आणि पीडितांना संरक्षण मिळणं, हाच खरा न्याय असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे.






