Uddhav Thackeray | राज्य विधानभवनात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी असा आरोप केला की, “आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा” अशा धमक्या देऊन गुंडांना पक्षात घेतलं जातं.
उद्धव ठाकरे म्हणाले – सत्तेचा माज, गुंडांचा राजकीय गंगास्नान :
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसत आहे. मंत्र्यांना खोके उघडताना पाहिलं आहे आणि काल तर विधानभवनाच्या आवारात थेट हाणामारी झाली. हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे.”
ते पुढे म्हणाले, “गुंडांना धमकी दिली जाते की, आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा. त्यांना पक्षात घेऊन पवित्र केलं जातं. हा गुंडांचा नवरा राजकीय जन्म आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.”
‘गुंडांना पक्षात घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’ :
उद्धव ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना याबाबत जबाबदार ठरवले. “सर्व पक्षांनी एकत्र बसून अशा गुंडांना पदांवरून दूर करण्याचा निर्णय घ्यायला हवा. विधीमंडळात जर असे प्रकार घडत असतील तर राज्याची प्रतिमा देशात कशी दिसेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Uddhav Thackeray | काय घडलं होतं नेमकं? :
विधानभवन परिसरात राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यात आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मारहाण झाली. या प्रकरणाचा व्हिडीओही समोर आला आहे. आव्हाड यांनी आरोप केला की, “मला मारण्यासाठीच गुंड आणले गेले होते.”
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटले, “जर विधीमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत, तर हे राज्य कायद्याने चालतंय की सत्तेच्या मर्जीनं?” त्यांनी अशी परिस्थिती पाहून सामान्य जनतेने काय भूमिका घ्यावी, हाही प्रश्न उपस्थित केला.






