Tur Dal Prices | यवतमाळातील तूरडाळीला (Tur Dal Prices) मोठी मागणी आहे. राज्यातील तूरही देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, विदेशातून तूरडाळ आयात सुरू झाली, तसेच कर्नाटकातही (Karnataka) तुरीचे उत्पादन वाढले. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांत तुरीचे दर क्विंटलमागे तब्बल चार हजारांनी घसरले आहेत.
यवतमाळ येथील बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली असून, आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तूर विकावी लागत आहे.
असे घसरले तुरीचे दर
राज्यभरात 12 लाख हेक्टरपर्यंत तुरीची लागवड झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लागवड क्षेत्र सव्वा लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे, तर विदर्भाचे लागवड क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. शेतकऱ्यांनी मिश्र पीक म्हणून, तसेच काही ठिकाणी सरसकट तुरीची पेरणी केली. चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र योग्य भावाअभावी उत्पादन खर्चही निघतो की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.
2024 मध्ये एप्रिलपासून तुरीच्या दरात सुधारणा झाली होती. आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल असलेली तूर नोव्हेंबर महिन्यात 12 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली होती. मात्र डिसेंबर अखेरच्या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली. 12 हजारांवरून तूर आता 6500 ते 7300 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
कर्नाटकात 450 रुपये बोनस
जानेवारीत कर्नाटकातील तूर बाजारात आली, तेव्हाच दर घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे कर्नाटक सरकारने हमीदरासोबत 450 रुपयांचा बोनस दिला. त्यामुळे तेथील शेतकऱ्याला आठ हजारांचा दर मिळाला आहे. (Tur Dal Prices)
हमी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
यंदा तुरीला पावसाचा फटका बसला. राज्य शासनाने 12 लाख टन तूर उत्पादन होणार असल्याने, हमी केंद्रावर (Procurement Centre) दोन लाख 97 हजार टन खरेदीचे नियोजन केले. हे हमी केंद्र सुरू व्हायचे आहे. याचवेळी खुल्या बाजारात दर पडले. तुरीचा हमीभाव 7550 रुपयांचा आहे.
Title : Tur Dal Prices Fall by Four Thousand in Two Months






