पुण्यात 3 नव्या महापालिका होणार; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

On: August 8, 2025 10:09 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Pune News| पुण्यात पुन्हा एकदा तीन नव्या महापालिकांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज (८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. चाकण-शिक्रापूर आणि पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये १५०० हून अधिक कंपन्यांमध्ये सुमारे साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात दररोज लाखो वाहनांची ये-जा असते. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. या पाहणीदरम्यान अजित पवारांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तीन नव्या महापालिका होणार

अजित पवार यांनी यावेळी चाकणची तुलना बारामतीशी करू नका असेही म्हटले आहे. ते म्हणाले की, “आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी ५:४५ वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे आणि त्यासाठी निधीही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करूयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करूयात.”

अजित पवारांची घोषणा

अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. यापैकी एक मांजरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची या भागात, दुसरी चाकण परिसरात आणि तिसरी हिंजवडी भागात महापालिका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी ६ वाजताच्या पाहणीदरम्यान एक गाडी थांबली की लगेच गाड्यांच्या रांगा लागतात, तर पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असे त्यांनी म्हटले.

पाहणी करत असताना, चाकणच्या चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहने रोखून धरली होती. यामुळे कोंडीत भर पडली. यावर अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. “ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहने थांबवून कोंडी का केली आहे? सगळी वाहतूक सुरू करा,” असे अजित पवार म्हणाले. तसेच, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.

News Title- Three New Municipal Corporations for Pune District

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now