टीईटी पेपर लीक प्रकरणात तिघे ताब्यात, आता पुन्हा परिक्षा कधी?

On: June 27, 2026 4:00 PM
TET Exam Paper Leak
---Advertisement---

TET Exam Paper Leak  | राज्यात पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या (28 जून) होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) पेपरफुटीमुळे ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी NEET 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर आल्याने पुन्हा एकदा परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भिवंडीतून पेपरफुटीचा उलगडा; तिघे संशयित ताब्यात

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा धागा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे सापडला. कोनगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर डायमंड हॉटेलवर छापा टाकण्यात आला. पोलिस पोहोचण्यापूर्वी संशयित तेथून पसार झाले होते.

त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी सहारा विमानतळ परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आढळल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणण्यात आले असून, कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयितांकडे सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुन्हा टीईटी परीक्षा कधी होणार?

पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखेबाबतचे नियोजन लवकरच जाहीर केले जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. अशा स्वरूपाची परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया आवश्यक असते.

परीक्षा परिषदेने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.

6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. पुढील 2 ते 3 दिवसांत नवीन परीक्षा तारीख जाहीर केली जाईल. राज्यातील 37 शहरांमधील 1028 परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा आयोजित केली जाईल.

टीईटीचा पेपर नेमका कसा फुटला?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. NEET 2026 मधील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

मात्र, 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना काही व्यक्तींकडे टीईटी प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून संशयितांकडील माहितीची पडताळणी करण्यात आली.

तपासादरम्यान संशयितांकडे असलेले काही प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

News Title: TET Exam Paper Leak Bhiwandi Police Action Corrections 2026

Join WhatsApp Group

Join Now