Swargate Bus Stand Crime | शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट एसटी आगारातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार
या अमानुष घटनेतील आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तो तातडीने पसार झाला. स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागातही महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींचा आधार घेतला जात आहे.
रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया-
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जात असले तरी अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सकाळी सहा-साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पीडित तरुणीने नऊच्या सुमारास पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पोलिस पथके कार्यरत असून पुण्यासह परिसरातील ग्रामीण भागातही शोधमोहीम राबवली जात आहे. आरोपीच्या कॉल डिटेल्सचा (CDR) मागोवा घेतला जात असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
Title : Swargate Bus Stand Crime Woman Assaulted, Accused Absconding






