मुंबई | भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीचा गौप्यस्फोट केला, त्यानंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे. या भेटीनंतर धस यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मी लपून भेट घेतली नाही- सुरेश धस
सुरेश धस यांनी या भेटीबाबत स्पष्ट करताना सांगितले की, “मी कोणतीही भेट लपून घेतलेली नाही. धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली होती. भरणे मामांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेल्याचे समजले. त्यामुळे मी त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला न्यायासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचेही सुरेश धस यांनी ठामपणे सांगितले. “मी फक्त विचारपूस केली आणि निघून आलो. या भेटीत कोणतीही वेगळी चर्चा झालेली नाही. मात्र, न्यायाच्या लढ्यात मी मागे हटणार नाही. लवकरच आणखी काही गोष्टी सांगणार आहे,” असे धस यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर भाष्य करताना सांगितले की, “सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची बैठक तब्बल चार ते साडेचार तास चालली होती. ही एक पारिवारिक भेट होती. दोघांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद नाहीत.” बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर धस आणि मुंडे यांच्यातील भेटीची बातमी समोर आली.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या या भेटीनंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण तापवण्यात सुरेश धस यांचा महत्त्वाचा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अशा वेळी धस यांनी घेतलेली धनंजय मुंडे यांची भेट या प्रकरणाची गुंतागुंत वाढणारी आहे. दुसरीकडे या भेटीने राजकीय समीकरणे बदलत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात या भेटीचा कोणता परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.






