Maharashtra Elections Result | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाबाबत अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Decision) अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन टप्प्यांच्या मतदानाचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरलाच जाहीर केला जाईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
मतदानानंतर लगेच निकाल जाहीर करावा, अशी. याचिकाकर्त्यांची मागणी होती. मात्र, न्यायालयाने मतमोजणी एकत्रित होण्याची आणि निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याची राज्य निवडणूक आयोगाची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील नगरपरिषद, नगर पंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाबाबतचा संभ्रम आता पूर्णपणे दूर झाला आहे.
सुनावणीत काय घडले? याचिका का फेटाळली? :
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court Decision) आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी २ डिसेंबरला झालेल्या मतदानाचा निकाल २० डिसेंबरच्या मतदानापूर्वी जाहीर करावा, अशी मागणी न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, दोन्ही टप्प्यांची निवडणूक प्रक्रिया एकत्रित असल्याने मतमोजणी केवळ एकदाच होऊ शकते. त्यामुळे विभाजित निकाल जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला दुजोरा देत राज्य निवडणूक आयोगाला कठोर सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, २० डिसेंबर रोजीच्या मतदानात काही तांत्रिक अडचण आली तरीही निकालाची तारीख बदलणार नाही. २१ डिसेंबरची तारीख कायम ठेवण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.
Maharashtra Elections Result | निवडणुकीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बराच काळ प्रलंबित राहिल्या असल्याने न्यायालयाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. आजच्या सुनावणीतही न्यायालयाने याच भावना व्यक्त करत, निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे ठामपणे नमूद केले. (Maharashtra Elections Result)
या निवडणुका ‘सब्जेक्ट टू आउटकम’ म्हणजेच आरक्षणासंबंधी भविष्यातील अंतिम निर्णयाच्या अधीन घेतल्या जात आहेत. तरीही, प्रक्रिया कोणत्याही कारणामुळे पुढे ढकलली जाऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश देत सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला बांधील केले आहे. (Local Body Elections Result)
या निर्णयानंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अंतिमता प्राप्त झाली असून, नागरिकांना आता २१ डिसेंबर रोजी निवडणुकीचे संपूर्ण चित्र दिसणार आहे.






