Sonu Nigam | आपल्या सुरांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गायक म्हणजे सोनू निगम. तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतो. त्यांच्या गाण्यांसोबतच अनेक वेळा त्यांचे संगीत कार्यक्रमही चर्चेत राहतात. अलिकडेच एका संगीत कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे.
सोनू निगमवर स्टेजवर परफॉर्म करताना दगडफेक
सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) नुकताच दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) येथे आयोजित एंजिफेस्ट 2025 मध्ये सहभागी झाला होता. सोनू निगम स्टेजवर आपल्या खास अंदाजात गाणे सादर करत असताना अचानक प्रेक्षकांमधून काही असभ्य विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केली. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला.
“मी इथे तुम्हाला आनंद देण्यासाठी आलो आहे. मजा करणं चांगलंच आहे, पण कृपया असं वागू नका,” असे भावनिक आवाहन करत सोनू निगमने प्रेक्षकांना शिस्तबद्ध राहण्यास सांगितले. स्टेजवरील सुरक्षा आणि व्यवस्थापन यासाठी त्याने उपस्थित आयोजकांनाही सूचना दिल्या.
टीममधील काही सदस्य जखमी
या घटनेदरम्यान सोनू निगमच्या टीममधील काही सदस्य जखमी झाले. या घटनेनंतर विद्यापीठ महोत्सवांतील गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जरी काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असला तरी बहुसंख्य प्रेक्षक सोनू निगमच्या गायकीचा आनंद घेत होते. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी जयजयकार केला आणि त्याला गाण्यासाठी आग्रह धरला.
सोनूनेही आपल्या चाहत्यांचा मान राखत काही लोकप्रिय गाणी सादर केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी सोनू निगमच्या संयमाचे कौतुक केले आहे.






