दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय!

On: April 2, 2026 4:25 PM
SSC Exam 2026
---Advertisement---

SSC Exam 2026 | महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र वेगवेगळे न देता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे कागदपत्रे सांभाळण्याचे काम अधिक सोपे होणार आहे.

बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळी कागदपत्रे जपून ठेवण्याची गरज राहणार नाही. गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट एकाच दस्तऐवजात मिळाल्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना कागदपत्रांची पडताळणीही अधिक वेगाने होऊ शकणार आहे.

प्रमाणपत्रावरील नावाचा फॉरमॅट बदलला :

बोर्डाने प्रमाणपत्रावरील विद्यार्थ्यांच्या नावाच्या फॉरमॅटमध्येही मोठा बदल केला आहे. पूर्वी प्रमाणपत्रावर सर्वप्रथम आडनाव, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव आणि वडिलांचे नाव असे क्रम असायचे. मात्र आता सुधारित नियमानुसार प्रथम विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असे नवीन स्वरूप लागू करण्यात आले आहे.

बोर्डाच्या मते हे स्वरूप अधिक स्पष्ट आणि सुसंगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटवताना होणारा गोंधळ कमी होणार आहे. तसेच शैक्षणिक व शासकीय कागदपत्रांमध्ये नावाचा एकसमान फॉरमॅट ठेवण्यासही मदत होणार आहे. (SSC Marksheet New Rule)

SSC Exam 2026 | फोटो आणि तपशील तपासण्याच्या सूचना :

विद्यार्थ्यांच्या तपशिलात कोणतीही चूक राहू नये यासाठी बोर्डाने शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. जर हॉल तिकीट किंवा बोर्डाच्या रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असेल तर तो त्वरित बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदललेला फोटो शाळेच्या मुख्याध्यापकांकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सध्या विद्यार्थ्यांची नावे आणि फोटोंची पडताळणी युद्धपातळीवर सुरू असून शाळांच्या मुख्याध्यापकांना हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम प्रमाणपत्रावर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन :

बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा फोटोमध्ये काही चूक आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. योग्य वेळी दुरुस्ती केल्यास अंतिम प्रमाणपत्रात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. (Maharashtra Board SSC Result)

या बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. एकाच दस्तऐवजात सर्व माहिती उपलब्ध असल्याने प्रवेश प्रक्रिया, नोकरीसाठी अर्ज आणि इतर शासकीय कामांमध्ये पडताळणी अधिक जलद होण्याची शक्यता आहे.

News Title: SSC Board Big Decision: 10th Result and Passing Certificate to be Issued as Single Document

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now