Shivsena Shinde Group | कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शिंदे गटातील काही जुन्या आणि अनुभवी नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून, याचा थेट परिणाम राजीनाम्यांच्या मालिकेत झाला आहे.
महापालिका निवडणुकीआधीच पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय वातावरण तापलं असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत असल्याचं दिसून येत आहे. (KDMC Election 2026)
कैलास शिंदेंची थेट हकालपट्टीची मागणी :
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे थेट पत्र लिहून स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकारणावर कठोर शब्दांत टीका केली असून, “आज निष्ठेला किंमत उरलेली नाही, केवळ आर्थिक क्षमता हाच निकष बनला आहे,” असा गंभीर आरोप केला आहे. (Kailas Shinde Resignation)
चार प्रभागांचा एकत्रित पॅनल निवडणूक आयोगाने तयार केल्यामुळे सर्वसामान्य आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी निवडणूक लढवणं अशक्य झाल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या प्रभागात सुमारे ५२ हजार मतदार असून, एवढ्या मोठ्या पातळीवर निवडणूक खर्च पेलणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं. वीस वर्ष पक्षासाठी काम करूनही ऐनवेळी युतीमुळे कार्यकर्त्यांवर घरी बसण्याची वेळ येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Shivsena Shinde Group | मनोज गणपत चौधरी यांचा पदाचा राजीनामा :
याच पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमधील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि परिवहन समितीचे माजी सभापती मनोज गणपत चौधरी (Manoj Chaudhari) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2018 पासून आपण इच्छुक उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं असून, पक्षाकडून संधी आणि सन्मान मिळेल, अशी आश्वासनं देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र भाजपसोबत युती झाल्यानंतर आपल्याला डावललं जाईल, अशी भावना निर्माण झाल्यामुळेच आपण जिल्हाप्रमुखांकडे राजीनामा सादर केल्याचं मनोज चौधरी यांनी सांगितलं. सध्या कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नसला, तरी युतीनंतरच्या परिस्थितीमुळे प्रचंड निराशा झाल्याचं त्यांनी मान्य केलं. (Kalyan Dombivli Politics)
दरम्यान, सलग होत असलेले राजीनामे, उघडपणे व्यक्त होत असलेली नाराजी आणि पैशांवर आधारित निवडणूक व्यवस्थेवरील आरोप यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष स्पष्ट झाला आहे. महापालिका निवडणुकीआधीच हा असंतोष अधिक वाढण्याची चिन्हं असून, आगामी काळात राजकीय समीकरणं आणखी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.






