Shivangi Joshi | टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता कुशल टंडन (Kushal Tandon) याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आता तिने साखरपुडा झाल्याचा खुलासा केला आहे. मात्र, तिचा होणारा जोडीदार कोण आहे, याबाबत तिने अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
‘मी एंगेज्ड आहे’, शिवांगीचा धक्कादायक खुलासा :
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. त्यानंतर ‘बडे अच्छे लगते हैं 2’ (Bade Achhe Lagte Hain 2) या मालिकेतही तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली. सध्या ती ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) या शोमध्ये सहभागी झाली असून, याच कार्यक्रमात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. (Shivangi Joshi News)
शोमधील एका संवादादरम्यान अभिनेत्री श्रेया कालरा (Shreya Kalra) हिने शिवांगीला ती सध्या जोडीदाराच्या शोधात आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिवांगी म्हणाली की, आता तिला थेट लग्न करायचे आहे. पुढे योग्य जोडीदाराबद्दल विचारणा होताच तिने, “मी एंगेज्ड आहे,” असे सांगितले. तिच्या या विधानामुळे उपस्थितांसह चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, साखरपुडा नेमका कुणासोबत झाला, तो व्यक्ती मनोरंजन क्षेत्रातील आहे की नाही किंवा इतर कोणतीही माहिती तिने यावेळी दिली नाही. या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Shivangi Joshi | कुशल टंडनसोबत ब्रेकअपनंतर नव्या चर्चांना उधाण :
यापूर्वी शिवांगी जोशी अभिनेता कुशल टंडनला डेट करत होती. ‘बरसातें’ (Barsatein) मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यांनी आपल्या नात्याची सार्वजनिक कबुलीही दिली होती. त्यांच्या लिपलॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि चाहत्यांनी या जोडीवर भरभरून प्रेमही व्यक्त केले होते. मात्र, नात्याची घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकअपची माहिती कुशल टंडनने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती, तर शिवांगीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
कुशलसोबतचे नाते संपल्यानंतर शिवांगीचे नाव ‘बडे अच्छे लगते हैं 2’मधील सहकलाकार हर्षद चोपडा (Harshad Chopda) याच्यासोबत जोडले गेले होते. गणेशोत्सवादरम्यान हर्षदला शिवांगीच्या घरी झालेल्या पूजेतही पाहिले गेले होते. सध्या हे दोघेही ‘लॉक अप 2’ या शोमध्ये सहभागी आहेत. दरम्यान, शिवांगीच्या साखरपुड्याच्या खुलाशामुळे तिच्या होणाऱ्या जोडीदाराबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






