Sharad Mohol Murder Case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणात मोठा कायदेशीर ट्विस्ट समोर आला आहे. या खुनामागचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार याला तातडीने मुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. (Sharad Mohol Murder Case)
शरद मोहोळचा ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या घटनेने पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांना मुख्य सूत्रधार ठरवत पोलिसांनी कठोर कारवाई केली होती.
नेमकं प्रकरण काय आहे? :
शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करत एकूण १८ आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केला होता. पुण्यातील विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या तब्बल १७५० पानांच्या आरोपपत्रात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे या खुनामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, विठ्ठल शेलारने पोलिसांकडून झालेल्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस रिट’ याचिका दाखल केली होती. मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पनवेल येथून अटक करण्यात आली असली, तरी कायद्यानुसार आवश्यक असलेली प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचा दावा शेलारकडून करण्यात आला.
Sharad Mohol Murder Case | अटक बेकायदेशीर ठरली, कोर्टाचा स्पष्ट निकाल :
विठ्ठल शेलारला (Vitthal Shelar) अटक केल्यानंतर २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करण्यात आले नाही, तसेच अटकेची ठोस कारणे आणि कायदेशीर आधार आरोपीला सांगितला गेला नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात मांडण्यात आला. या मुद्द्यांना उच्च न्यायालयाने महत्त्व देत अटक बेकायदेशीर ठरवली.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने शेलारच्या बाजूने निकाल देत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे पुणे पोलिसांना मोठा कायदेशीर दणका बसला असून, भविष्यातील तपास आणि खटल्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Vitthal Shelar Released)
दरम्यान, ‘हेबियस कॉर्पस रिट’ ही बेकायदेशीर अटकेविरोधातील प्रभावी याचिका असून, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडून तिचा वापर केला जातो. या निकालामुळे शरद मोहोळ खून प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






