Palash Muchhal | प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या खासगी आयुष्यामुळे काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भर मांडवात लग्न मोडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे. सांगलीमध्ये त्याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) बालमित्र विज्ञान माने (Vidnyan Mane) याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पलाश मुच्छलविरोधात तक्रार दिली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विज्ञान माने यांचा आरोप आहे की, ‘नजरिया’ या चित्रपटासाठी गुंतवणूक करण्यास सांगून पलाशने त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली.
नेमकं प्रकरण काय आहे? :
तक्रारीनुसार, पलाश मुच्छलने आपण ‘नजरिया’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगत विज्ञान माने यांना प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 25 लाखांच्या गुंतवणुकीवर 12 लाखांपर्यंत मोबदला मिळेल, असं आश्वासन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच या चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचंही आश्वासन दिलं होतं, असं विज्ञान माने यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. मात्र वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेतल्यानंतरही कोणतीही परतफेड न झाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Palash Muchhal | पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल नाही :
या प्रकरणात विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्याविरोधात आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत तक्रार दिली आहे. मात्र पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सध्या केवळ तक्रार प्राप्त झाली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.






