Pune School Holiday | पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोमवारी, 19 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील ठराविक भागांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026’ सायकलिंग स्पर्धेमुळे शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक निर्बंध लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (Pune School Holiday)
या निर्णयामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद राहणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ही सुट्टी जाहीर केली आहे.
‘या’ भागांतील शाळा-कॉलेज राहणार बंद :
हा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे. हा निर्णय शासकीय, खासगी, अनुदानित शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांवर लागू राहणार आहे. सोमवारी, 19 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026’ मधील ‘प्रोलॉग रेस’च्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन, सिंहगड रोड आणि वारजे-कर्वेनगर या भागांतील शैक्षणिक संस्थांना हा आदेश लागू राहणार आहे.
Pune School Holiday | वाहतूक निर्बंधांमुळे घेतला निर्णय :
या सायकलिंग स्पर्धेमुळे फर्गसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता तसेच त्यांना जोडणारे उपमार्ग सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (School Closed Pune)
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून संबंधित क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्थांना सोमवारी सुट्टी राहणार आहे. प्रशासनाने पालक आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. (Pune School Holiday)
दरम्यान, देश-विदेशातील खेळाडू आणि अधिकारी पुण्यात दाखल होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बदलांची पूर्वकल्पना घेऊनच घराबाहेर पडावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






