पुणे-सातारा प्रवाशांसाठी महत्वाची माहिती! 45 मिनिटांचा प्रवास होणार 10 मिनिटात

On: January 18, 2026 3:06 PM
Pune Traffic News
---Advertisement---

Pune Satara Highway | पुणेकरांसाठी आणि साताऱ्याकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat Tunnel) बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या घाटातून प्रवास करताना अनेकदा 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. (Pune Satara Highway News)

मात्र आता या घाटात तयार करण्यात येणाऱ्या आधुनिक बोगद्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे. विशेष म्हणजे साताराहून पुण्याच्या दिशेने जाणारा एक बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असून वाहनचालकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

तयार झाले दोन आधुनिक बोगदे :

पुणे-सातारा महामार्गावरील एस-आकाराच्या वळणांचा खंबाटकी घाट (Khambatki Ghat Tunnel) हा अपघातप्रवण आणि वाहतुकीसाठी अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे दोन स्वतंत्र बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला होता. पुणे आणि साताऱ्याच्या दिशेने प्रत्येकी एक असे दोन बोगदे तयार करण्यात येत असून प्रत्येक बोगद्यात तीन लेन आहेत.

या प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून, यातील एक बोगदा 17 जानेवारीपासून सर्वसामान्य वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. सध्या या बोगद्यातून हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दरी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर जड वाहनेही या मार्गावरून धावू शकणार आहेत.

Pune Satara Highway | प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार :

दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खंबाटकी घाटातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळी 45 मिनिटे लागणारा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुणे ते सातारा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

खंबाटकी घाटातील तीव्र वळणं, अरुंद रस्ते आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत होते. हे टाळण्यासाठी 2019 मध्ये या बोगदा प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र कोरोना काळात कामात अडथळे आले. आता या प्रकल्पासाठी मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Pune Satara Highway)

डाव्या बाजूचा बोगदा सुमारे 1300 मीटर लांबीचा असून उजव्या बाजूचा बोगदा 1224 मीटर लांबीचा आहे. पुण्याच्या दिशेने बोगदा संपल्यानंतर बांधण्यात येणाऱ्या दरी पुलाचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा घाट रस्ता इतिहासजमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

News Title: Pune to Satara Travel to Become Faster: Khambatki Ghat Journey Reduced from 45 Minutes to Just 10

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now