Pankaja Munde | बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात मोठ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय समन्वयामुळे परळीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी “मी परळी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) दिली आहे, आता मी माळाकोळीवर लक्ष देणार आहे,” असे स्पष्ट विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
या विधानानंतर आता प्रत्यक्ष कृतीतूनही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसत आहे. परळी नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, परळीच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र समोर आले आहे.
परळी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा वरचष्मा :
परळी नगरपरिषद निवडणुकीत (Parali Election) भाजपाकडे तब्बल नऊ नगरसेवक असतानाही उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खैसर राजा खान यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असल्यामुळे उपनगराध्यक्ष भाजपाचा असावा अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घडामोडीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खरंच परळी धनंजय मुंडेंना सोपवली का, अशी चर्चा परळीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथे कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या विधानाला आता प्रत्यक्ष राजकीय निर्णयांची जोड मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
Pankaja Munde | भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता :
पंकजा मुंडे यांच्या या निर्णयामुळे परळीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात परळीत भाजपाची भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे मानले जात आहे. परळीतील सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादीचे वजन वाढल्याने येत्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी दिलेला शब्द पाळल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत असून, बीड जिल्ह्यातील राजकारणात हा बदल महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.






