SBI ATM Charge | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्यात आली असून, याचा थेट फटका नियमितपणे एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः इतर बँकांच्या एटीएमवरून रोख रक्कम काढणाऱ्यांसाठी हा निर्णय खर्चिक ठरणार आहे. (SBI Salary Account Rules)
एसबीआयने एटीएम तसेच एडीडब्ल्यूएम मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्क वाढवण्यासोबतच सॅलरी अकाउंट धारकांना मिळणारी ‘अमर्याद मोफत व्यवहार’ ही सुविधा बंद केली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणतीही मर्यादा नसलेले व्यवहार करणाऱ्या खातेदारांवर आता ठराविक मर्यादा लागू होणार आहेत. (ATM Transaction Fees India)
1 डिसेंबरपासून लागू झाले नवे नियम :
एसबीआयचे हे नवीन एटीएम शुल्क नियम 1 डिसेंबर 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. बचत खातेधारकांसाठी इतर बँकांच्या एटीएमवर दरमहा पाच मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आली आहे. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर रोख रक्कम काढण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार आहे. (SBI ATM Charge)
मर्यादेपेक्षा जास्त रोख पैसे काढल्यास आता प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये आणि त्यावर जीएसटी आकारला जाणार आहे, जो यापूर्वी 21 रुपये होता. त्याचप्रमाणे बॅलन्स चौकशीसारख्या नॉन-फायनान्शिअल व्यवहारांसाठीचे शुल्कही वाढवून 11 रुपये प्लस जीएसटी करण्यात आले आहे.
SBI ATM Charge | सॅलरी अकाउंटधारकांवर जास्त परिणाम :
या बदलांचा सर्वाधिक फटका सॅलरी अकाउंटधारकांना बसणार आहे. आतापर्यंत त्यांना एटीएमवर अमर्याद मोफत व्यवहारांची सुविधा मिळत होती, मात्र आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार सॅलरी अकाउंटधारकांना दरमहा केवळ 10 मोफत व्यवहार करता येणार आहेत.
ही मर्यादा ओलांडल्यानंतर रोख पैसे काढण्यासाठी 23 रुपये आणि इतर व्यवहारांसाठी 11 रुपये तसेच त्यावर जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे वारंवार इतर बँकांच्या एटीएमचा वापर करणाऱ्या सॅलरी अकाउंटधारकांचा मासिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. (SBI ATM Charge News)
दरम्यान, एसबीआयने काही बाबींमध्ये ग्राहकांना दिलासा दिला आहे. एसबीआयच्या स्वतःच्या एटीएमवर एसबीआय कार्डने व्यवहार केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच कार्डलेस विड्रॉल सुविधा अजूनही पूर्णपणे मोफत असून, बीएसबीडी खातेदारांवर कोणतीही अतिरिक्त शुल्कवाढ लागू करण्यात आलेली नाही. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंटरचेंज फी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असून, पुढील काळात इतर बँकाही असेच बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






