Sampada Munde Case | फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी आता हॉटेल मधुदीपचे (Hotel Madhudeep) मालक दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या तेव्हा खूप घाबरलेल्या दिसत होत्या, असे त्यांनी सांगितले. ही हत्या नसून आत्महत्याच आहे आणि हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
मध्यरात्री चेक-इन, सकाळी ठीकठाक, मग दुपारी संशय…
दिलीप भोसले यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये आल्या होत्या. त्यांनी दोन दिवसांसाठी खोली बुक केली होती. हॉटेलमध्ये चेक-इन करताना त्या खूप घाबरलेल्या (पॅनिक) अवस्थेत दिसत होत्या. त्यांना स्वतःची गाडी व्यवस्थित आत लावता आली नाही, त्यामुळे हॉटेलच्या वॉचमनने त्यांची गाडी पार्क केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टरने हॉटेलमध्ये फोन केला होता, तोपर्यंत त्या व्यवस्थित होत्या, असे भोसले म्हणाले. त्यांनी सकाळी बारामतीला (Baramati) जायचे असल्याचे चेक-इनवेळी सांगितले होते. मात्र, दुपारपर्यंत त्यांच्या खोलीतून काहीच प्रतिसाद न आल्याने आणि दार ठोठावूनही न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला.
मालकाचा दावा
संशय आल्यानंतर सुरुवातीला पोलिसांना संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळण्यास उशीर होत असल्याने वकिलांचा सल्ला घेऊन दरवाजा उघडल्याचे भोसले म्हणाले. आत डॉक्टरने गळफास घेतल्याचे दिसताच तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही घटना हत्या नसून आत्महत्याच आहे, असे भोसले यांनी ठामपणे सांगितले. आपण गेली ३०-३५ वर्षे सामाजिक कार्यात आहोत, त्यामुळे काही राजकीय विरोधक आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हॉटेलची प्रतिमा मलिन करण्याचा हा कट असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यापूर्वी ही हत्या असल्याचा आरोप केला होता.






