Pune News | पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाला आता ‘सरकार शितोळे सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून सुशोभीकरणाच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्यात आला होता. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला असून शहरातील नागरिकांसाठी हा पूल आकर्षणाचा विषय ठरत आहे. (Sarkar Shitole Setu)
या पुलाच्या सुशोभीकरणामुळे परिसराचा देखावा अधिक आकर्षक झाला आहे. त्यामुळे सांगवी, बोपोडी आणि परिसरातील नागरिकांना आता प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या पुलाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
अजित पवारांच्या हस्ते झाले होते उद्घाटन :
सांगवी-बोपोडी पूल (Sangvi Bopodi Bridge) हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या पुलाचे भूमिपूजन 5 जानेवारी 2022 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते.
नुकतेच या पुलाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुलावरील सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर आता तो पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
Pune News | कसा आहे ‘सरकार शितोळे सेतू’? :
‘सरकार शितोळे सेतू’ (Sarkar Shitole Setu) हा सुमारे 760 मीटर लांबीचा असून त्यासाठी जवळपास 40 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पुलावर उभारण्यात आलेली आकर्षक कमान हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. या कमानीची उंची सुमारे 26 मीटर असून तिचे वजन जवळपास 650 टन आहे. वास्तुविशारद श्रुती शहा यांनी या कमानीची रचना केली आहे. (Pimpri Chinchwad Bridge)
दरम्यान, या पुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरी काही तांत्रिक अडचणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या पुलावर दुभाजक नसल्यामुळे एकाच दिशेने वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाऊन वळसा घ्यावा लागत असून बोपोडीमार्गे सांगवीकडे जाण्यासाठी दुभाजक उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






