Santosh Dhuri News | आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का बसला असून वरळीतील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसेकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अखेर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरे यांच्यावर माझी कोणतीही नाराजी नाही, मात्र मनसेत काही कटकारस्थानी लोक कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या वक्तव्यामुळे मनसेच्या अंतर्गत राजकारणावर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकला गेला आहे.
‘मनसेत बडव्यांची भूमिका’, बाळा नांदगावकरांवर थेट आरोप :
राज ठाकरे यांनी पूर्वी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख करत संतोष धुरी म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात विठ्ठलाच्या बाजूला बडवे होते, त्याचप्रमाणे मनसेतही काही बडवे कार्यरत आहेत. बाळा नांदगावकर हेच काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जास्त बोलणारे आणि पुढे जाणारे कार्यकर्ते झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्यामुळे पक्ष कायम चर्चेत राहायचा, मात्र तरीही आम्हालाच डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप धुरी यांनी केला. युती झाली पाहिजे, असे सातत्याने सांगणाऱ्या बाळा नांदगावकरांनी त्या युतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे का, याचा विचार केला नाही, असेही संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी सांगितले.
Santosh Dhuri News | मनसेत आणखी नाराजी, दोन-तीन मोठे चेहरे बाहेर पडण्याची शक्यता :
मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (sandip deshpande) नाराज असल्याच्या चर्चांवरही संतोष धुरी यांनी भाष्य केले. पक्षातच अशी वातावरणनिर्मिती केली जात असल्याचा आरोप करत, निवडणुकीपूर्वी मनसेतील दोन-तीन महत्त्वाचे चेहरे पक्ष सोडतील, असा दावा त्यांनी केला. मात्र, कोण कोण जाणार याची नावे घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संतोष धुरी (Santosh Dhuri) हे राज ठाकरे यांच्या मनसेचे माजी नगरसेवक असून, मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. मागील मनपा निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र पराभव झाला होता. यंदा वार्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, मात्र जागा उद्धवसेनेला गेल्याने नाराजी वाढली आणि अखेर त्यांनी 6 जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.






