Sanjay Raut | महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अधिकृतपणे संपल्यानंतरही राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. प्रचार बंदीच्या कालावधीतही घराघरात जाऊन प्रचार आणि पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर संशय व्यक्त करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान दिले असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. (Maharashtra municipal election controversy)
प्रचार संपल्यानंतरही प्रचाराची मुभा देण्याचा निर्णय म्हणजे सत्ताधाऱ्यांना दिलेले “तिळगुळ” असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आधीची परंपरा मोडून अचानक नियम बदलण्यात आले, यामागे नेमका कोणाचा फायदा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या वातावरण असे आहे की साड्यांमधून, वृत्तपत्रांमधून आणि पाकिटांतून खुलेआम पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पैसा आणि धर्माशिवाय निवडणूक जिंकण्याची ताकद नाही :
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत म्हटले की, ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना जनतेकडून बदडले जात आहे आणि आज दिवसभरात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण आणि पैशांचे वारेमाप वाटप याशिवाय सत्ताधाऱ्यांकडे निवडणूक जिंकण्याचा कोणताही विचार किंवा नैतिक बळ नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्ता आणि पैशांचा गैरवापर हीच त्यांची खरी ताकद असल्याचा घणाघातही त्यांनी केला. (Sanjay Raut statemen)
लोकशाही वाचवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे सांगत राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानांचा उल्लेख केला. लोकशाहीच्या रक्षणासाठी अन्याय करणाऱ्यांना विरोध झाला, तर लोकशाही नावाची संस्था अशा लढ्याला आशीर्वाद देईल, असे ते म्हणाले. सत्तेच्या जोरावर निवडणूक प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Sanjay Raut | हा पैसा येतो कुठून? राऊतांचा थेट सवाल :
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडील पैशांच्या स्रोतावर थेट प्रश्न उपस्थित केला. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाकडे प्रचंड पैसा आहे, पण हा पैसा नेमका येतो कुठून, असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांनीच शेकडो कोटींच्या फायली मंजुरीसाठी आल्याचे सांगितले होते, मग हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संपूर्ण सत्तास्थापनेवर संशय व्यक्त केला. (Election Commission criticism)
निवडणूक आयोग आणि ACB काहीच करणार नाहीत, असा आरोप करत राऊत यांनी अजित पवार आणि गणेश नाईक यांना थेट आव्हान दिले. कोड्यात बोलू नका, हिंमत असेल तर समोर येऊन स्पष्ट बोला, असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे म्हणण्यामागचे कारण काय, हे उघड करण्याची मागणी केली. उघड आरोप न करता सूचक वक्तव्ये करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग असल्याचा घणाघात करत, महाराष्ट्राच्या हितासाठी सत्य लोकांसमोर आणा, असे खुले आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.






