Samruddhi Expressway | देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Mumbai–Nagpur Samruddhi Expressway) प्रवास करणाऱ्यांसाठी पुढील काही दिवस अडचणीचे ठरणार आहेत. अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्याच्या कामामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 60 किलोमीटरचा पट्टा ठराविक वेळेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक बंदीचा निर्णय का आणि कुठे? :
स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील जालना जिल्ह्यातील बुलढाणा लोणार, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा मार्गावरील 300.4 ते 365.8 किलोमीटर दरम्यानचा भाग 9 ते 18 फेब्रुवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक सुमारे 50 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबवली जाणार आहे.
या बंदीचा उद्देश महामार्गावर अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणा बसवण्याचा असून, वाहनचालकांनी प्रवासापूर्वी योग्य नियोजन करावे, असे आवाहन MSRDC कडून करण्यात आले आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’वर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या काळात वेळेचा अतिरिक्त विचार करून मार्गक्रमण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Samruddhi Expressway | गॅन्ट्री प्रणाली व महामार्गाची वैशिष्ट्ये :
या कामाअंतर्गत महामार्गावर गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. हायवे किंवा एक्स्प्रेसवेवर वरून आडवे उभारले जाणारे हे मोठे संरचनात्मक फ्रेमवर्क असून त्यावर वाहतूक चिन्हे, दिशादर्शक फलक, इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली (FASTag), तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. यामुळे वेग नियंत्रण, नियमांचे पालन, अपघातांची तात्काळ नोंद आणि आपत्कालीन सेवांना जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी सुमारे 701 किलोमीटर असून, यामुळे पूर्वी 17 ते 18 तास लागणारा प्रवास आता साधारण 8 तासांत पूर्ण करता येतो. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), नाशिक, अहिल्यानगर (Ahilyanagar), वाशिम आणि ठाणे या 10 जिल्ह्यांतील सुमारे 390 गावांना जोडतो. विशेष बाब म्हणजे, हा देशातील एकमेव महामार्ग आहे जिथे वाहनांना ताशी 150 किलोमीटर वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या मार्गावर इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम (ITS), ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, लाईव्ह व्हिडिओ मॉनिटरिंग, वाहतूक नियमभंग ओळखण्यासाठी प्रणाली, ड्रोनद्वारे देखरेख तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट्स यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. दर 100 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रॉनिक टोल केंद्रही उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होते.






