Ketan Agrawal Case | पुणे (Pune) येथील बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agrawal) मृत्यू प्रकरणात तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आल्यानंतर आता सियाचा भाऊ साहिल गोयल (Sahil Goyal) याच्याभोवतीही तपासाची दिशा फिरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
साहिलला आधीपासून माहिती होती का? :
29 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची पोलीस कोठडी संपत असल्याने तपासासाठी आणखी सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर तपासादरम्यान सियाचा भाऊ साहिल गोयल याच्याकडूनही अधिक माहिती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळताना चेतन चौधरी आणि साहिल गोयल यांची मैत्री झाली होती, अशी माहिती साहिलने स्वतः दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर साहिलसोबत सामना पाहण्यासाठी गेलेल्या सियाची चेतनशी ओळख झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यामुळे सिया आणि चेतन यांच्या नात्याची माहिती साहिलला आधीपासून होती का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये केतन अग्रवाल आणि सियाचा साखरपुडा झाला होता. मात्र केतनशी विवाह करण्याची इच्छा नसल्याचे सियाने साहिलला सांगितले होते का, तसेच बाली (Bali) येथे प्री-वेडिंग शूटसाठी घरातून निघताना दोघांमध्ये वाद झाला होता का, याचाही तपास केला जाऊ शकतो.
Ketan Agrawal Case | पासपोर्ट प्रकरण आणि लोहगडचा मुद्दा चर्चेत :
तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनचा पासपोर्ट गायब झाल्याची घटना आहे. फूड मॉलमध्ये सियाने केतनचा पासपोर्ट फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबई (Mumbai) विमानतळावर पोहोचल्यावर केतनला पासपोर्ट सापडला नव्हता. जर सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, ही बाब साहिलला आधीपासून माहीत होती, तर पासपोर्ट गायब झाल्यानंतर त्याला याबाबत संशय आला होता का आणि आला असेल तर त्याने तो व्यक्त का केला नाही, असे अनेक प्रश्न या प्रकरणात उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, अग्रवाल कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत लोहगड (Lohagad) येथे जाण्याबाबतही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी परवानगी नाकारूनही अवघ्या 12 दिवसांत चार वेळा सियाने लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला होता. केतनला डोंगर आणि किल्ल्यांवर फिरण्याची आवड असल्याचा फायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 30 मे रोजी पहिल्यांदा परवानगी मिळाली होती, मात्र 4 जून रोजी नकार मिळाल्यानंतर सियाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अखेरीस 18 जून रोजी वाढदिवसाचे कारण सांगून तिने केतनला लोहगडावर नेले आणि किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.






