Rupali Thombre | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात अचानक खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो पोस्ट करून ठोंबरे यांनी आपल्या भविष्यातील राजकीय दिशेबाबत मोठा संकेत दिल्याचे मानले जात आहे. रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) या मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थ असून, त्या नेमक्या कोणत्या पक्षात जाणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्यासोबतचा वाद, तसेच पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढल्यानंतर ठोंबरेंनी काही दिवसांपूर्वी विविध पदांचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. अशातच आता या पार्श्वभूमीवर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टला मोठे राजकीय वजन प्राप्त झाले असून, त्यांच्या पुढील पावलाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडिया पोस्टने सर्वत्र चर्चा :
रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी फेसबुकवर दोन जुने फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्या २००५ मधील स्वतःचा फोटो शेअर करत म्हणतात, “तेव्हापासून समाजात आणि राजकारणात मनगटाच्या जोरावर काम केले आहे.” दुसऱ्या पोस्टमध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “आयरे गैरे नथू खैरे यांनी शिकवू नयेच,” असा थेट संदेश देत त्यांनी आपली राजकीय दिशा अधिकच स्पष्ट केली आहे.
या फोटोंमध्ये सातत्याने शरद पवार यांचा संदर्भ असल्याने, रुपाली ठोंबरे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच अजित पवार गटातून त्यांचे बाहेर पडणे आता निश्चित मानले जात असून, त्या अधिकृत घोषणा कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रुपाली ठोंबरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष :
ठोंबरेंची दिशा फक्त शरद पवारांकडेच वळते की शिवसेनेकडे, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने, त्यांच्या शिवसेना प्रवेशाचाही तर्क वर्तवला जात आहे.
यामुळे ठोंबरेंची भूमिका नेमकी कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकते आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी की शिंदेंची शिवसेना याबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र यासंदर्भात दोन्ही शक्यता बळकट असल्याने त्यांचा पुढील निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवीन पदाबाबतचा खुलासा :
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून नुकतीच पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या घोषणेत ठोंबरे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे की, “माझी पुणे शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती आधीच ६ महिन्यांपूर्वी झाली होती. नवीन कार्यकारिणीत माझी कुठलीही फेरनियुक्ती झालेली नाही,” असा खुलासा त्यांनी माध्यमांना केला.
त्यामुळे पक्षाने त्यांची मनधरणी केली असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीसोबत त्यांच्या दुराव्याला आणखी पुष्टी मिळाली आहे.






