RTE Admission | शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right to Education Act) (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांना १ ते १० मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४७,९०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. (RTE Admission)
प्रवेशासाठी मुदतवाढ
‘आरटीई’ प्रवेश मुदतवाढीसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदा राज्यातील ८,८५३ शाळांमधील १,०१,०८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३,०५,१५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
ऑनलाइन सोडतीद्वारे (Online lottery) १,०१,९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून, प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राज्यभरातून ४७,९०६ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, सुमारे ५४,०६१ जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
निवासी पुराव्याबाबत स्पष्टीकरण
प्रवेशप्रक्रियेत पालकांच्या निवासी पुराव्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार, स्वतःच्या मालकीची निवासव्यवस्था असलेल्या पालकांना शिधापत्रिका (Ration card), वाहन चालविण्याचा परवाना (Driving license), वीज देयक (Electricity bill), दूरध्वनी देयक, मिळकत करदेयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पारपत्र (Passport), आधारकार्ड (Aadhaar card), राष्ट्रीयीकृत बँकेची खातेपुस्तिका (Passbook) यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
स्वतःच्या मालकीची निवास व्यवस्था नसलेल्या पालकांना ते ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहेत, त्या क्षेत्रातील निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची खातेपुस्तिका यांपैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. (RTE Admission)
Title : RTE Admission Process Extended till March 10






