Rohit Sharma | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आणि ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या टीमसोबत त्याने केलेला मराठीत संवाद महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला आहे. “मुंबईत राहतो तर मराठी येणारच” या एका वाक्याने त्याने चाहत्यांची मने जिंकली.
रेस्टॉरंटमधील भेट ठरली खास :
क्रिकेटच्या मैदानावर ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित सध्या खेळापासून काहीसा दूर असला तरी त्याच्याशी संबंधित प्रत्येक घडामोड चाहत्यांच्या चर्चेत असते. नुकतीच मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातील कलाकारांची त्याच्याशी भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आणि नाटकातील इतर कलाकारही दिसून येतात.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये संपूर्ण टीम एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असताना अचानक रोहित शर्मा (Rohit Sharma) तिथे येतो आणि त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. वातावरणात उत्साह निर्माण होतो. कलाकार मंडळी त्याच्यासोबत आनंदात गप्पा मारताना दिसतात.
Rohit Sharma | मराठीत संवाद; चाहत्यांची मनं जिंकली :
या भेटीत नम्रता संभेराव रोहितला मराठीत विचारते, “कसे आहात तुम्ही?” त्यावर रोहित हसत “मी मजेत आहे” असे उत्तर देतो. त्यानंतर नम्रता त्याला सांगते की तो अनेकदा मराठीत बोलताना दिसतो, म्हणूनच तिने मराठीत संवाद साधला. यावर रोहितने दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
“काही नाही, समजते मला! मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच!” असे रोहितने सहजपणे म्हटले. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे उपस्थित कलाकार थक्क झाले, तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही त्याचे भरभरून कौतुक केले. नम्रता संभेरावने व्हिडीओ शेअर करताना त्याच्या साधेपणाचे आणि मराठी भाषेबद्दलच्या जिव्हाळ्याचे विशेष उल्लेख केले आहेत.
रोहित शर्मा मूळचा नागपूर (Nagpur) येथील असला तरी त्याचे बालपण आणि संपूर्ण क्रिकेट कारकीर्द मुंबई (Mumbai) येथेच घडली. अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये किंवा सामन्यादरम्यान स्टम्प माईकमधून त्याचे मराठी शब्द ऐकू येतात. मात्र या वेळी त्याने ज्या आत्मीयतेने आणि सहजतेने मराठीत संवाद साधला, त्यामुळे त्याचे महाराष्ट्राशी असलेले नाते पुन्हा अधोरेखित झाले आहे.






