गौतम गंभीर टीम इंडियाची साथ सोडणार? वर्ल्ड कप दरम्यान ‘या’ आयपीएल टीमची मोठी ऑफर

On: February 17, 2026 12:09 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir | आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा रंगात आलेली असताना भारतीय क्रिकेट वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारताने ग्रुप टप्प्यातील तीनही सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अशातच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आयपीएलमधून मोठा प्रस्ताव आल्याची माहिती समोर आली आहे.

राजस्थानकडून तीन भूमिकांचा प्रस्ताव :

टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांच्या जागी गौतम गंभीर यांनी टीम इंडियाच्या हेड कोचपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आशिया कप 2025 जिंकत टी20 मालिकांमध्येही यश मिळवले. मात्र त्यांच्या कार्यकाळात वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील कामगिरी घसरल्याची नोंद आहे.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रेंचायझीच्या नव्या मालकांपैकी एकाने गंभीर यांना मोठी ऑफर दिली आहे. या प्रस्तावात त्यांना पार्टनर, मेंटॉर आणि सीईओ अशा तीन महत्त्वाच्या भूमिका देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. याशिवाय दोन ते तीन टक्के भागभांडवल देण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. सध्या राजस्थान फ्रेंचायझीतील बहुसंख्य भागधारक आपला हिस्सा नव्या मालकांना विक्री करत असून हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे.

Gautam Gambhir | हितसंबंधांचा प्रश्न आणि गंभीरची भूमिका :

गंभीर यांना आयपीएलचा अनुभव नवीन नाही. ते यापूर्वी खेळाडू म्हणून स्पर्धेत उतरले होते, तसेच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचे मेंटॉर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2024 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे राजस्थानकडून त्यांच्यावर डोळा ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

सध्याच्या परिस्थितीत ते हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानुसार, जो लोढा समितीच्या शिफारशींवर आधारित आहे, एखादी व्यक्ती एकाच वेळी आयपीएल फ्रेंचायझी आणि भारतीय राष्ट्रीय संघात पद भूषवू शकत नाही, कारण त्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होतो. तसेच गंभीर यांचा टीम इंडियातील कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे. जर त्यांनी राजस्थानची ऑफर मान्य करायची ठरवली, तर त्यांना मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागेल. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आणि सध्या भारताच्या हेड कोचपदावर लक्ष केंद्रित केल्याचे संकेत दिले आहेत.

News Title: Rajasthan Offer for Gautam Gambhir

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now