Raj Thackeray Sabha | मिरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ‘राज गर्जना’ सभेला उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा करणाऱ्या मनसेकडून आज मोठे शक्तिप्रदर्शन होणार असून, सभेच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. ही सभा आज (१८ जुलै) मिरा रोडच्या नित्यानंदनगर येथे होणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मीरा रोड परिसरामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढल्यावर, मनसेकडून मराठी अस्मितेसाठी प्रत्युत्तर देत ८ जुलैला मोर्चा काढण्यात आला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता स्वतः मीरा रोडमध्ये उपस्थित राहून मनसे सैनिकांना शाबासकी देणार आहेत. (Raj Thackeray Sabha)
जिथे राडा तिथेच सभा; मनसे शाखेचेही उद्घाटन :
विशेष म्हणजे ही सभा त्या ठिकाणी होणार आहे जिथे काही दिवसांपूर्वी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. जोधपूर स्वीट अॅण्ड फरसाण या दुकानासमोर राज ठाकरे यांचे ढोल-ताशांनी स्वागत होणार असून, त्यानंतर ते अवघ्या ३०० मीटरवर असलेल्या सभास्थळी पोहोचणार आहेत.
सभेसाठी २४ बाय २८ फुटांचे भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच, सभेच्या दिवशी जवळच्या सेंट पॉल शाळेला अर्धा दिवसाची सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मनसेच्या नव्या शाखेचे उद्घाटन देखील राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
Raj Thackeray Sabha | मराठी अस्मितेचा आवाज बुलंद होणार? :
मिरा रोडमध्ये ८ जुलै रोजी काढण्यात आलेल्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत मोर्चा यशस्वी केला. या मोर्च्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे मनसेचे खांदे उंचावले आहेत आणि त्यातच आजची सभा या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याचे संकेत देणार आहे. (Today Raj Thackeray Sabha)
राज ठाकरे आज काय बोलणार याकडे केवळ मीरा भाईंदरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेचे लक्ष लागले आहे. मराठी भाषिकांवर अन्याय केल्यास परिणाम काय होतो, हे दाखवून देण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






