ठाकरे बंधूंनी इगो बाजूला ठेवला! विजयी मेळाव्यासाठी ‘कोणी कुठं बसायचं’ ठरलं?

On: July 4, 2025 10:28 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Thackeray Vijayi Melava | त्रिभाषा धोरण रद्द झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा ५ जुलै रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापले मतभेद आणि पक्षीय अहंकार बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Thackeray Vijayi Melava)

एकत्रित नियोजन, एकत्रित जबाबदाऱ्या :

मेळाव्याचं यशस्वी आयोजन करण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र काम करत आहेत. सोशल मीडियावर जोरदार प्रचार, बॅनर, जाहिराती यासाठी संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. यावेळी बॅनरबाजी, घोषणाबाजी करताना एकमेकांना डिवचले जाणार नाही याची सुव्यवस्था राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर असणार आहे. रंगीत तालीम शुक्रवारीच पार पडणार असून, दोन्ही नेत्यांच्या आगमनापासून भाषणापर्यंतचा कार्यक्रम आखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय व्यासपीठावर फक्त पक्षाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांनाच स्थान दिले जाणार आहे; उर्वरित नेते व्यासपीठासमोर बसणार आहेत.

Thackeray Vijayi Melava | ठाकरे बंधू ठरणार केंद्रबिंदू :

मेळाव्याचा केंद्रबिंदू अर्थातच राज आणि उद्धव ठाकरे हेच असणार आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनाही व्यासपीठाखाली स्थान दिलं जाणार आहे. एलईडी स्क्रीन्सच्या माध्यमातून मेळाव्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. गर्दीच्या अंदाजामुळे डोमच्या गॅलऱ्या आणि बाहेरील मोकळ्या जागेतही बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

वरळी डोम परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर झळकत आहेत. यामध्ये राज, उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्र फोटो लावण्यात आले आहेत. ‘जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले, त्यांनी परत यावं’ किंवा ‘मराठी द्रोही लोकांना सरळ करायचंय, आदेशाची वाट पाहतोय’ अशा स्वरूपाचे बॅनरही झळकत आहेत. यामुळे मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिक तापले आहे. (Thackeray Vijayi Melava)

News Title: Raj and Uddhav Thackeray Unite for Vijayi Melava; Seating Plan Decided, MNS & Shiv Sena Leaders Share Responsibilities

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now