Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व आक्रमक आंदोलन छेडले. इंजिनिअरिंग परीक्षेतील निकाल घोळ, पुनर्परीक्षा आणि कॅरी ऑनच्या मागण्यांवरून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या दिला. काही विद्यार्थ्यांनी थेट बॅरिकेट्स तोडून कुलगुरूंच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
निकालात घोळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश :
काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागाचा निकाल जाहीर झाला. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, निकालात गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. “फक्त एका विषयात नापास झाल्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये”, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन पद्धती लागू करण्याचा आग्रह धरला आहे.
विद्यार्थ्यांनी सांगितलं की, “निकालात बऱ्याच जणांचं गुणपत्रक चुकीचं आहे. काहींना विषय नसताना नापास दाखवण्यात आलं आहे. अशा स्थितीत आमच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या वाटा अडखळत आहेत.” (Pune University)
Pune University | कुलगुरूंनी वेळ दिली… पण आलेच नाहीत? :
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, “कुलगुरूंनी आम्हाला 10 मिनिटांचा वेळ दिला होता. पण ठरलेल्या वेळेनंतरही ते आमच्याकडे आले नाहीत, त्यामुळे आम्ही बॅरिकेट्स तोडून कार्यालयाच्या दिशेने जावं लागलं.”
विद्यार्थ्यांचा आक्रोश इतका वाढला की विविध विभागांमधील विद्यार्थी एकत्र आले आणि आंदोलन आणखी तीव्र झालं. यावेळी काही विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली असता, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखलं.
पोलिसांची तातडीची कारवाई :
विद्यापीठ प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, आंदोलन शांततेत मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, काही काळासाठी विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण होतं.
विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय? :
– निकालातील घोळाची तातडीने चौकशी
– फक्त एका विषयात नापास असणाऱ्यांना ‘कॅरी ऑन’ सुविधा
– पुनर्परीक्षेची घोषणा करावी
– विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा
– एक शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले असून, चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे.






