Pune News | पुण्यातील एका १८ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला संपवून घेण्यापूर्वी त्याने आपल्या आईसाठी भावनिक ऑडिओ रेकॉर्ड करत अंतिम निरोप दिला. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
संजय विनोदकुमार राजपूत (वय १८, रा. पिंपरी-चिंचवड) असे त्या तरुणाचे नाव आहे. संजय याने विषारी औषध प्राशन करून आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे, या आत्मघातकी निर्णयाआधी त्याने आपल्या मोबाईलवर एक ऑडिओ मेसेज रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने म्हटले, “आई, मी विष घेतलंय… माझा मृतदेह घेऊन जा.” या भावनिक वाक्यांनी संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे.
लोकेशन पाठवून मृत्यू, डिप्रेशनमुळे उचललं टोकाचं पाऊल :
संजय राजपूत गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होता, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. त्याच्या कुटुंबाने १७ जून रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर २२ जून रोजी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर टेकडीच्या पायथ्याशी सापडला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटलीही आढळली.
पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, संजयने विष प्राशन करून जिरवण संपवलं आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणताही पुरावा उरू नये अशी खबरदारी घेतल्याचंही ऑडिओमध्ये नमूद आहे.
Pune News | “माझ्या बहिणीचं शिक्षण थांबू नये…” – शेवटच्या शब्दांत भावनिक मागणी :
संजयने केवळ आईला निरोप दिला नाही, तर आपल्या दोन बहिणींबाबतही काळजी व्यक्त केली. “त्यांना नीट शिकवा, त्यांचं भविष्य घडवा,” अशी मागणी त्याने ऑडिओमध्ये केली आहे. संजयचा हा ऑडिओ आणि आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ सध्या पोलिस तपासाअंतर्गत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजयने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून विषारी औषध मागवले होते. त्यामुळे पोलिसांकडून ऑनलाईन खरेदीच्या लिंकचा तपासही सुरू आहे. (Pune News)
पोलिस तपास सुरू, समाजात हळहळ :
संजयचा मृत्यू हे फक्त एक वैयक्तिक दु:ख नाही, तर समाजातल्या वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा आरसा आहे. अवघ्या १८व्या वर्षी नैराश्यामुळे टोकाचं पाऊल उचलणं ही चिंताजनक बाब असून, मानसिक आरोग्याबाबत समाजात अधिक जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.






