Pune News | ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात रस्तोरस्ती ‘ओपन बार’ सुरू झाल्याचे चित्र आहे. मध्यवस्तीपासून उपनगरांपर्यंत सर्वत्र वाईन शॉपबाहेरच दारू पिण्याचे प्रकार वाढले असून, या मद्यपींची भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थांच्या गाड्याही तेथे लागत आहेत. या प्रकारांकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग, शहर पोलीस आणि महानगरपालिका या तिन्ही यंत्रणांनी डोळेझाक केल्याचे दिसून येते. (Pune News)
‘मद्यपींचा त्रास, नागरिकांचा संताप’
शहरातील रस्त्यांवर मद्यपींचा ‘दरबार’ भरत असल्याच्या प्रकारावर यापूर्वी बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन या प्रकारांना चाप लावला होता. मात्र, आता पुन्हा शहरातील चित्र बदलले आहे. अगदी महापालिकेच्या दारातही हे प्रकार चालत आहेत. उपनगरातही ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेरच दारू प्यायली जात असल्याचे दिसून आले. वाईन शॉपबाहेर मद्यपान करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी अखेर ‘येथे मद्यपान करू नये’ असे फलक लावले आहेत.
परिसरात मद्यपींचा धुडगूस
परिसरातील एका वाईन शॉपजवळ रस्त्यावरच लोक दारू पितात. येथे दारू पिण्याचे प्रमाण इतके जास्त आहे, की स्थानिक लोक त्या त्रासाला कंटाळले आहेत. त्यांनी या परिसरात ठिकठिकाणी फलक लावले असून, ‘येथे दारू पिऊ नये,’ असे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. (Pune News)
‘वाईन शॉपच्या बाहेर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्रेते थांबत असतील, तेथील अन्नपदार्थ खरेदी करून तेथेच दारू प्यायचे प्रकार घडत असतील, तर तेथील वाईन शॉपला टाळे लावा,’ अशी सूचना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाघोली येथील पाहणी दौऱ्यात स्थानिक पोलिसांना केली होती. तोच नियम शहरात इतर ठिकाणीदेखील लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील वाइन शॉपवर आता काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Title : Pune News Open Bars on Streets






