Pune News | राज्यातील काही शहरांमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडसह पुण्यामध्ये ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, सर्वेक्षण करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News)
गुईलेन बॅरी सिंड्रोम हा ऑटोइम्युन आजार असून, तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र, अलीकडील काळात जीबीएस रुग्णांवर यशस्वी उपचारांमुळे त्यांच्यात समाधानकारक सुधारणा होताना दिसत आहे. सर्व वयोगटांतील रुग्ण या आजारातून बरेदेखील होत आहेत. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वेळेवर योग्य उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे रुग्ण आठ ते दहा दिवसांत बरे होत आहेत.
लक्षणांकडे द्यावे लक्ष
व्यवस्थित काळजी घेतल्याने आणि योग्य उपचाराने ‘जीबीएस’ बरा होतो. गिळण्यास त्रास होणे किंवा हातापायांत कमजोरी येणे या लक्षणांवर तातडीने उपचार केल्यास अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. व्हायरल इन्फेक्शननंतर येणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास ‘जीबीएस’वर सहज मात करता येते.
ही घ्यावी दक्षता
पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे. अचानकपणे हातापायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील रुग्णालयात जावे. (Pune News)
सर्वेक्षणासाठी पथक
पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करणार आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अनेक आजार होतात. दूषित पाणी आणि अशुद्ध अन्न यामुळे हा आजार बळावतो. पुण्यात सध्या शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असून, एकाचा बळी गेला आहे. शहरातदेखील 15 रुग्ण आढळले आहेत.
थोडक्यात, ‘जीबीएस’ हा आजार वेळेवर उपचार केल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. नागरिकांनी या आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच, पिण्याचे पाणी आणि अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. (Pune News)
Title: Pune News GBS Patients-Can-Recover-In-10-Days-With-Timely-Treatment-15-Patients-Under-Treatment-In-City-Hospitals






