Pune News l पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी खडकी येथे नवीन स्वतंत्र रेल्वे टर्मिनल उभारण्यास रेल्वे बोर्डाने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. या टर्मिनलचे काम सध्या सुरू असून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या नवीन टर्मिनलमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि दररोज २०० हून अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील हा वाढता ताण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर आणि खडकी येथे दोन नवीन टर्मिनल्स विकसित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. यापैकी हडपसर रेल्वे टर्मिनलला मंजुरी मिळाली असून त्याचे कामही सुरू झाले आहे. तेथून एक एक्स्प्रेस गाडीही सुरू करण्यात आली आहे. आता प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने खडकी येथे नवीन टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Pune News l ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर :
रेल्वे बोर्डाने मार्च २०२४ मध्ये खडकी टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यासाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून खडकी येथे एक नवीन प्लॅटफॉर्म आणि दोन स्टेबलिंग लाइन्स विकसित करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी इतर अनेक कामेही केली जाणार आहेत. खडकी टर्मिनलमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या येथून सोडणे शक्य होणार आहे. याशिवाय काही लोकल गाड्याही येथून सोडता येतील. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
नवीन कामांचा तपशील :
खडकी टर्मिनलवर एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकची रुंदी आणि उंची वाढवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म यार्ड लाइन चारची दुरुस्ती आणि रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच पादचारी पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. खडकी येथील टर्मिनलचे काम सुरू असून ते डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.






