पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांची नावे बदलली

On: December 22, 2025 1:21 PM
Pune Metro News
---Advertisement---

Pune Metro | पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या शहरात पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मेट्रो मार्ग कार्यरत असून, या मार्गांवरील काही मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पुण्याच्या स्थानिक ओळखीला अधिक महत्त्व देण्यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून काही मेट्रो स्थानकांची नावे बदलावी, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने पुणेकरांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. महामेट्रोने अधिकृतपणे याबाबत माहिती देत तीन महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांच्या नामांतराची घोषणा केली आहे.

‘मंडई’ स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव :

महामेट्रोच्या माहितीनुसार, मंडई मेट्रो स्थानकाचे नाव आता ‘महात्मा फुले मंडई’ असे करण्यात आले आहे. मंडई परिसराशी महात्मा ज्योतिराव फुले यांचे ऐतिहासिक आणि सामाजिक योगदान लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. या मागणीसाठी माळी महासंघासह विविध सामाजिक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारकडून नामकरणाला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे.

वनाज ते रामवाडी मार्गिकेवरील नळस्टॉप मेट्रो स्थानकाचे नाव आता ‘एसएनडीटी’ असे करण्यात आले आहे. हे स्थानक एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जवळ असल्यामुळे प्रवाशांना ओळखणे अधिक सोपे व्हावे, यासाठी हे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, आयडियल कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव बदलून ‘पौड फाटा’ असे करण्यात आले आहे. पौड फाटा हा परिसरातील एक महत्त्वाचा आणि ओळखीचा चौक असल्यामुळे हे नामकरण करण्यात आल्याचे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले आहे.

Pune Metro | फलक आणि नेमप्लेट्स लवकरच बदलणार :

महामेट्रोने स्पष्ट केले आहे की, येत्या काही दिवसांत या सर्व स्थानकांवरील नेमप्लेट, दिशादर्शक फलक आणि इतर माहितीफलक नव्या नावांनुसार अद्ययावत केले जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानक ओळखणे अधिक सुलभ होणार असून, गोंधळ किंवा दिशाभूल होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक इतिहास, सामाजिक योगदान आणि परिसराची ओळख जपणारे हे नामकरण पुणे मेट्रो प्रवासाला अधिक नागरिकाभिमुख आणि सुकर बनवेल, अशी प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

News Title : Pune Metro Renames Key Stations: Mandai Becomes Mahatma Phule Mandai, Nal Stop to SNDT

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now