Mohan Bhagwat | भारतीय समाजातील बदलत्या नातेसंबंधांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपच्या संकल्पनेवर टीका करत कुटुंब आणि विवाह व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या समाजात वाढत चाललेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या प्रवृत्तीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.
मोहन भागवत (Mohan Bhagwat Statement) म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक अनेकदा जबाबदारी घेण्यास तयार नसतात. ही संकल्पना केवळ सोयीसाठी असते, पण समाजासाठी ती योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. कुटुंब आणि विवाह ही फक्त शारीरिक समाधानाची साधनं नसून समाजाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुटुंब हे मूल्य आणि संस्कृती घडवण्याचं केंद्र :
कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व विशद करताना मोहन भागवत यांनी सांगितले की, कुटुंब ही अशी जागा आहे जिथे व्यक्ती समाजात कसं राहायचं, हे शिकतो. माणसाला आवश्यक असलेली मूल्य, संस्कार आणि जबाबदारीची भावना कुटुंबातूनच मिळते. समाज घडवण्यासाठी कुटुंब ही मूलभूत रचना असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. ( Live in Relationship India)
ते पुढे म्हणाले की, कुटुंब हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक व्यवस्थेचाही केंद्रबिंदू आहे. बचत, संपत्ती, सोनं, आर्थिक नियोजन या सर्व गोष्टी कुटुंबाभोवती फिरतात. सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांचा संगम कुटुंबातच होत असल्याने विवाह आणि कुटुंब व्यवस्थेपासून दूर जाणं समाजासाठी घातक ठरू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. लग्न करायचं नसेल, तर संन्यासी होणं स्वीकार्य आहे, पण जबाबदारी टाळणं योग्य नाही, असं विधान त्यांनी केलं.
Mohan Bhagwat | आदर्श कुटुंब, मुलांची संख्या आणि लोकसंख्येवर मत :
कुटुंब नियोजनावर बोलताना मोहन भागवत यांनी कोणताही ठराविक फॉर्म्युला नसल्याचं सांगितलं. मात्र संशोधनाच्या आधारे तीन मुलांचं कुटुंब आदर्श ठरू शकतं, असं त्यांनी मत व्यक्त केलं. १९ ते २५ वयोगटात लग्न झाल्यास आई-वडील आणि मुलांचं आरोग्य अधिक चांगलं राहतं, असं निरीक्षण त्यांनी मांडलं.
तीन मुलं असल्यास पालक आणि मुलांमध्ये जबाबदारीची भावना वाढते आणि ईगो मॅनेजमेंट शिकायला मिळतं, असं मानसोपचारतज्ज्ञांचं मत असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसंख्या हा विषय संवेदनशील असून ती एक ओझं असली तरी योग्य नियोजन केल्यास ती देशासाठी संपत्ती ठरू शकते, असंही भागवत म्हणाले.
पर्यावरण, पायाभूत सुविधा, महिलांचं आरोग्य, सामाजिक गरजा आणि देशाच्या भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांचा विचार करून लोकसंख्येची धोरणं ठरवली पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला.






