पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जात असलेल्या पिकअपचा भीषण अपघात; 7 महिलांचा मृत्यू, 20 भाविक जखमी

On: August 11, 2025 5:41 PM
ST Bus Accident
---Advertisement---

Pune Khed Accident | श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्ताने दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात होऊन 7 महिला भाविकांचा मृत्यू, तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिराकडे जाताना दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास झाला.

नागमोडी वळणावर जीपचा ताबा सुटला :

प्राथमिक माहितीनुसार, भाविकांची पिकअप जीप नागमोडी वळणावर घाट चढताना अचानक रिटर्न झाली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअपने 5 ते 6 पलट्या घेत रस्त्याच्या कडेला खाली कोसळली. या जीपमध्ये 25 ते 30 महिला भाविक प्रवास करत होत्या. अपघातात घटनास्थळीच 7 महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर परिसरातील स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिला रस्त्याच्या कडेला व शेतात पडलेल्या अवस्थेत होत्या. मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. श्रावण महिन्यात कुंडेश्वर व भीमाशंकर मंदिराकडे मोठ्या संख्येने भाविक जात असतात, मात्र या दुर्घटनेने धार्मिक वातावरणावर दु:खाची छाया पसरली आहे.

Pune Khed Accident | कल्याण-पुणे एसटी बस अपघात :

दरम्यान, आज सकाळी कल्याणवरून माळशेजमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचे चाक अचानक निखळले. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. सुदैवाने, हा प्रकार घाटात पोहोचण्यापूर्वीच घडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने मदत करण्यात आली. जखमींना प्राथमिक उपचार करून दुसऱ्या बसने प्रवास सुरू ठेवण्यात आला. (Pune Khed Accident)

एकाच दिवशी दोन अपघातांच्या घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घाटमाथ्यावरील नागमोडी वळणांवर वाहनांच्या ब्रेक आणि इंजिनची तपासणी, तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांची नियमित देखभाल करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

News Title: Pune Khed Accident: 7 Women Devotees Dead, 20 Injured in Pickup Van Crash While Going to Kundeshwar Temple

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now