Pune News l पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ आजाराचा उद्रेक झाला असून, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. संशयित रुग्णांचा शोध घेणे, पाणी आणि रुग्णांची तपासणी करून नमुने तपासणे, तसेच या आजाराचा उगम शोधणे, अशी कामे सुरू आहेत. दरम्यान, जीबीएसबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पुणेकरांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
‘निरोगी’ व्यक्तींना ‘जीबीएस’चा टार्गेट:
जीबीएसचे रुग्ण पाहिले असता, सर्वसाधारणपणे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच हा आजार होतो, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. कारण जीबीएसची लागण झालेले अल्पवयीन रुग्णही सापडले होते आणि ज्येष्ठ नागरिक देखील. मात्र, आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार, ज्या व्यक्तींना कोणताही आजार नाही, अशा ‘निरोगी’ व्यक्तींनाच ‘जीबीएस’ टार्गेट करत आहे.
Pune News l आरोग्य विभागाच्या विश्लेषणाचा निष्कर्ष:
पुणे शहरातील जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने (Rapid Response Team) केलेल्या अधिकृत डेटाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. कोणताही अंतर्निहित सह-रोग (Co-morbidity) नसलेले लोक गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणताही आजार नसलेल्या निरोगी व्यक्तींना देखील खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
‘निरोगी’ रुग्णांची संख्या अधिक:
पुणे जिल्ह्यात जानेवारी 2025 पासून सिंहगड रोड आणि आसपासच्या परिसरात जीबीएसचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. क्लस्टर्समध्ये (Clusters) जीबीएसची प्रकरणे नोंदवली गेली असून, 163 संशयित रुग्ण सापडले आहेत. या संशयित रुग्णांवर केलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, जीबीएसवर उपचार घेत असलेल्या सुमारे 67 टक्के म्हणजेच 110 रुग्णांना कोणताही सह-रोग नाही आणि त्या निरोगी व्यक्ती आहेत. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, सह-रोग असलेल्या जीबीएस रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे, या श्रेणीत फक्त 33 टक्के म्हणजे 53 रुग्ण आहेत.






